सिंचन विहिरींचे नवीन प्रस्ताव थांबविल्याने शेतकरी संतप्त
फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यात सध्या ३ हजार २६५ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. मागेल त्याला विहीर या धोरणानुसार शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी पूर्वी ४ लाख, तर एप्रिल २०२४ पासून ५ लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तालुक्यात २ हजार ५२ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली असून, अर्ध्याहुन अधिक विहिरींची कामे अपूर्ण आहेत.
अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा, त्यानंतरच नवीन विहिरींना मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका घेत शासनाने नरेगाचे पोर्टलच लॉक केले आहे. त्यामुळे यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सिंचन विहिरींचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे नवीन विहिरींचे नियोजन करणाऱ्या शेतकरी यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एप्रिल महिना अर्धा संपला आहे, तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. नवीन विहिरींचे प्रस्ताव स्वीकारावेत, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. कामांच्या टप्प्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. मात्र, काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे अनुदानही रखडले आहे.
काही शेतकऱ्यांनी अनुदान घेतले, पण पुढे विहिरीचे काम थांबविले. त्यामुळे अपूर्ण विहिरींची संख्या वाढत गेली. परिणामी, शासनाने नवीन सिंचन विहिरींचे प्रस्ताव अपलोड करणारे पोर्टलच लॉक केले आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरींचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीने तालुक्यातील शेकडो विहिरीचे, गोठ्याची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही.










